उद्योगमंत्र..... नवउद्योजकांसाठी
कोणताही अनुभव नसताना, व्यवसायाची माहिती नसताना, कुणाचेही मार्गदर्शन नसतानाही कितीतरी मराठी तरुण आज उद्योगजगतात पदार्पण करत आहेत आहेत. परंतु पुरेश्या मार्गदर्शनाअभावी या नवउद्योजकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या नवउद्योजकांना व्यवसायासंबंधी किमान सर्व गोष्टींची प्राथमिक माहिती व्हावी या उद्देशाने हा लेख प्रपंच.
मागील काही वर्षांपासून उद्योजकतेचे वारे महाराष्ट्रात वाहायला लागलेले आहे. नोकरीच्या मागे पळणारा तरुण व्यवसायाचा विचार करायला लागला आहे. पण याचवेळी या तरुणांना व्यवसायाची माहिती देणारा कुणीच भेटत नाहीये. व्यवसायाची सुरुवात करण्यापासून तो यशस्वीपणे चालविण्यापर्यंत सर्व क्षेत्रात अंधारातच हात पाय हलवावे लागत आहेत. शहरात किमान काही स्रोत तरी आहेत पण ग्रामीण भागातील परिस्थिती आणखी अवघड आहे. ग्रामीण भागात उद्योजकता वाढीस लागलेली आहे, परंतु तिचा योग्य तो विकास होताना दिसत नाही. याचे मुख्य कारण आहे योग्य मार्गदर्शनाचा अभाव.
उद्योगांच्या बाबतीत शहरी किंवा ग्रामीण यात जास्त भेद राहिलेला नाही. समस्या व गरजा दोघांच्याही समान आहेत, फक्त ग्रामीण भागात त्याची तीव्रता थोडी जास्त आहे. शहरात व्यवसायिक वातावरण रुळलेले असल्यामुळे काहीनाकाही कारणाने तुम्ही व्यवसायाशी जोडलेले असता, परंतु ग्रामीण भागातील तरुणांना अशा प्रकारची कुठलीच सोय नाही. यामुळेच ग्रामीण भागातील उद्योजकता वाढण्यात अडथळे येत आहेत, किंवा सुरु झालेले व्यवसाय यशस्वीपणे चालण्याचे प्रमाण कमी आहे. बऱ्याचदा व्यवसायात अपयश येण्याचे, किंवा व्यवसाय अपेक्षेप्रमाणे न चालण्याचे मुख्य कारण असते व्यवसाय सुरु करताना चुकलेल्या पायऱ्या, आणि व्यवसाय कसा करावा याचे अज्ञान. हि सुरुवात व्यवसाय निवडीपासूनच होत असते.
काय चुकतंय, काय करायला हवं, काय मार्ग आहेत, कशा प्रकारे पुढे जायला हवं याचा सविस्तर अभ्यास करणे आवश्यक आहे.
कोणताही अनुभव नसताना, व्यवसायाची माहिती नसताना, कुणाचेही मार्गदर्शन नसताना उद्योगजगतात पाऊल ठेवण्याआधी व्यवसायासंबंधी प्राथमिक माहिती करून घेणे आवश्यक आहे. हीच माहिती पाहूया थोडक्यात
हि माहिती वाचण्याआधी एक लक्षात ठेवा, व्यवसाय म्हणजे विक्री. तुमचे उत्पादन स्वतः विकण्याची तयारी असेल तरच व्यवसायात पाऊल ठेवा. व्यवसाय सुरु झाल्याझाल्या लगेच तयार ग्राहक अपेक्षित असतील किंवा कुणीतरी येऊन सगळा माल विकत घ्यावा, मार्केटिंग त्रास नको असा विचार करत असाल तर नोकरीच योग्य, कारण या मानसिकतेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त वर्षभर तग धरू शकता त्यापेक्षा जास्त नाही.
आहे तयारी स्वतःचे उत्पादन स्वतः विकण्याची..? मग पुढे दिलेली माहिती फक्त तुमच्यासाठीच आहे.
१. व्यवसाय निवड -
व्यवसाय निवड हि बहुतेकदा चुकणारी पायरी आहे. पायाच चुकलेला असेल तर इमारत कोसळणारच असते. असच काही व्यवसायाच्या याबाबतीतही घडत असतं. शेजारच्या कुणाचा तरी व्यवसाय यशस्वी झालाय म्हणून आपणही तो व्यवसाय करावा, किंवा एखाद्या वर्तमानपत्रात एखाद्याच्या यशाची कहाणी छापून अली म्हणून आपणही तोच व्यवसाय करावा, किंवा सगळे करतात म्हणून आपणही तेच करावे, किंवा कुणीतरी अमुक तमुक व्यवसाय कर त्यात खूप पैसा आहे असे सांगतोय म्हणून तोच व्यवसाय करावा अशा प्रकारे व्यवसाय निवड करण्याची सर्वसामान्य पण तितकीच चुकीची पद्धत दिसून येते.
यातच ग्रामीण भागातील व्यवसाय म्हटले कि डाळ मिल, मसाले, पापड, लोणचे उत्पादन इतकेच व्यवसाय सुचतात. त्यापलीकडेही शेकडो व्यवसाय आहे हे आपल्या गावीही नाही. जो तो उठतो तेच तेच व्यवसाय सुरु करतोय. यामुळे व्यवसाय क्षेत्रात एक प्रकारचे व्यवसायाचे डबके तयार झालेले आहे. या डबक्यातून बाहेर येणे आवश्यक आहे. योग्य व्यवसाय निवडणे आवश्यक झाले आहे.
व्यवसाय निवडताना तुमच्यासाठी काय योग्य आहे हे पाहायचे असते, ना कि इतरांनी काय केलंय, किंवा किती पैसे कमावलेत. व्यवसाय हा पैसे कमावण्यासाठीच असतो, आणि प्रत्येक व्यवसायात भरपूर पैसे मिळत असतो. त्यामुळे व्यवसाय निवडताना विचारपूर्वक निवडणे महत्वाचे असते.
व्यवसाय निवड करताना बऱ्याच गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात. तुम्हाला कोणत्या क्षेत्राचे ज्ञान आहे, तुमच्या परिसरातील मार्केट कसे आहे, तुमचे वैयक्तिक संपर्क कसे आहेत, परिसरातील ग्राहकांची मानसिकता कशी आहे, तुमची गुंतवणूक क्षमता किती आहे, तुम्ही व्यवसायासाठी कोणत्या स्तरापर्यंत वेळ आणि कष्ट देऊ शकता, तुमचा अनुभव व शिक्षण काय आहे, तुम्हाला कोणत्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे अशा वेगवेगळ्या बाबी ध्यानात घेऊन व्यवसाय निवडायचा असतो.
कोणता व्यवसाय करावा हा जवळजवळ सर्वांनाच पडणारा महत्वाचा प्रश्न
व्यवसायात मुख्यत्वे तीन प्रकार आपण पकडू शकतो. मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस आणि ट्रेडिंग किंवा रिटेल व्यवसाय. रिटेल म्हणजे दुकानाच्या माध्यमातून विक्री.
तुम्हाला आधी क्षेत्र निवडायचे असते त्यानंतर प्रोडक्ट.
जर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग करायचे असेल तर भाग ग्रामीण असो किंवा शहरी तुम्हाला तुमचे उत्पादन विकण्यासाठी शहरात वा परिसरात जावेच लागेल. शहरी भागात कोणताही व्यवसाय योग्य ठरू शकतो आणि ग्रामीण भागासाठी कोणताही स्पेशल असा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील व्यवसाय नसतो. तुमच्या ५०-१०० किमी परिसरात जे जे विकलं जाऊ शकत ते ते तुम्ही बनवू शकता. यातही फूड प्रोसेसिंग शी निगडित असेल तर स्थानिक पातळीवर कोणत्या पिकांचं जास्त उत्पादन होत एवढं फक्त तुम्ही बघू शकता.
बर... आता राहिला प्रश्न गुंतवणुकीचा, मार्केटिंग स्किल नसण्याचा, अनुभव नसण्याचा... व्यवसाय करायचा म्हटलं कि काहीतरी गुंतवणुकीची गरज पडतेच. पण तुमच्या गुंतवणूक क्षमतेनुसारच व्यवसाय तुम्हाला निवडणे आवश्यक आहे. बँकेकडून कर्ज मिळण्याची अशा जवळजवळ नगण्यच असते. पण जर बँक कर्ज देणार असेल तर तुमच्याकडे असलेल्या रोख गुंतवणुकीच्या जास्तीत जास्त ४ पट गुंतवणुकीच्या प्रोजेक्टचा विचार करावा. बँक कर्ज देत नसेल तर सरळ सरळ आपल्याकडे असलेल्या गुंतवणुकीत काय करू शकता याचा विचार करा.
याचबरोबर तुम्हाला मार्केटिंग व सेल्स चे गुण अवगत करावेच लागतात, सर्व व्यवसायांसाठी हे गुण आवश्यक असले तरी मॅन्युफॅक्चरिंग साठी या मार्केटिंग व सेल्स स्किल ची गरज सर्वात जास्त आहे. या मधे तुम्ही कुठे कमी पडत असाल तर अशावेळी ट्रेडिंग, रिटेल वा सर्व्हिस क्षेत्रातील व्यवसाय निवडू शकता. शहरी भागात कोणताही रिटेल व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू शकतो, तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर तुमच्या गावात किंवा तुमच्या परिसरातिल एखाद्या मोठ्या गावात सुरु करता येतील असे भरपूर ट्रेडिंग किंवा सर्व्हिस व्यवसाय आहेत. व्यवसाय करायचा म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगच केलं पाहिजे असा काही नियम नाही. एखादे चांगले दुकान तुम्ही सुरु करू शकता, किंवा सिझनल व्यवसाय करू शकता, प्रत्येक बाजार जोडता येतील असे फिरते व्यवसाय सुरु करू शकता, किंवा हॉटेल सुरु करू शकता.... कितीतरी मार्ग आहेत. तुमचं गाव बाजारपेठेच ठिकाण असेल किंवा परिसरातील एक महत्वाचं ठिकाण असेल किंवा तुमच्या परिसरात असं एखादं मोठं गाव असेल तर अशा ठिकाणी तुम्ही बरेच स्थानिक स्तरावर चालणारे व्यवसाय सुरु करू शकता.
व्यवसायाचा एक प्राथमिक नियम लक्षात ठेवा. व्यवसाय म्हणजे विक्री. काय विकू शकता याचा अभ्यास करा, कोणता व्यवसाय करावा याच उत्तर मिळेल.
२. सुरुवात करायची म्हणजे नक्की काय करायचे ?
व्यवसाय निवडला... पण पुढे काय ? सुरुवात कशी करावी? कशा प्रकारे व्यवसाय उभारावा हा नवउद्योजकांना सतावणारा दुसरा मुख्य प्रश्न. सुरुवात कुठून करावी या विवंचनेतच नवउद्योजकांचे कित्येक महिने निघून जातात. बऱ्याचदा इतका वेळ जातो कि व्यवसाय सुरु करण्याची उर्मीच कमी होते. व्यवसायाची सुरुवात करण्याचे काही ठराविक टप्पे आहेत. यानुसार वाटचाल केली तर व्यवसाय सुरु करण्यात अडचण येणार नाही.
मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायासाठी कशा प्रकारे सुरुवात करावी...
a ) निवडलेल्या व्यवसायाची लघुद्योग नोंदणी करून घ्यावी. यासाठी www.udyogaadhaar.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी लागते.
b ) नोंदणी झाल्यानंतर लगेच व्यवसायाच्या नावाने बँकेत करंट अकाउंट उघडून घ्यावे. स्वतःचे PAN कार्ड काढून घ्यावे.
c ) यानंतर विविध मशिनरी सप्लायर्स ची भेट घ्यावी. मशिनरींचे कोटेशन्स घ्यावेत. सर्व मशिनरी सप्लायर्स ची पूर्ण माहिती घ्यावी. त्यांनी या आधी ज्या कंपन्यांना मशिनरी दिलेल्या आहेत त्यांना भेट द्यावी. योग्य शहानिशा झाल्यानंतरच मशिनरी खरेदीचे नक्की करावे.
d ) कच्चा माल स्रोत शोधून ठेवावा. इतर खर्चाची माहिती घ्यावी.
e ) कर्ज प्रकरण करायचे असेल तर CA कडून प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून घ्यावा.
f ) कर्ज मंजूर झाल्यानंतर प्रोजेक्ट उभारणीला सुरुवात होते. ५-६ महिन्यात प्रोजेक्ट उभा राहतो.
g ) याकाळात मार्केट ची माहिती घ्यायला सुरुवात करावी. आपण निवडलेल्या प्रोडक्ट साठी संभावित ग्राहक कोणकोणते आहेत याची माहिती घ्यावी. यातील काहींना प्रत्यक्ष भेटून व्यवसायातील कांगोरे समजून घ्यावेत. ग्राहकांना काय हवंय, काय नको आहे याची माहिती घ्यावी. मार्केट कसे चालते याचा अभ्यास करावा. शक्य झाल्यास व्यवसाय सुरु करण्याआधी एखाद्या कंपनीत किंवा डिस्ट्रिब्युटर कडे ५-६ महिने सेल्स प्रतिनिधी म्हणून काम करावे. थेट फिल्ड वर काम केल्यामुळे मार्केटची पूर्ण माहिती मिळून जाते.
h ) प्रोजेक्ट उभा राहिल्यानंतर प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात होते. आणि अर्थातच मार्केटमध्ये प्रत्यक्ष उतरण्याची वेळ येते.
i ) आत्तापर्यंत तुम्ही फक्त मार्केट पाहिलेले असते आता प्रत्यक्ष मार्केट मधे जाण्याची वेळ असते. तुम्हाला तुमचे प्रोडक्ट तुमच्या अपेक्षित मार्केटमध्ये पोचवण्यासाठी प्रत्यक्ष फिल्ड वर काम करावे आवश्यक असते. त्यात कुठेही कमी पडू नका.
j ) प्रोजेक्ट उभा राहिल्यानंतर सबसिडीची कामे करून घ्यावीत. PMEGP अंतर्गत कर्ज घेतले असेल तर त्यासाठी प्रोजेक्ट सुरु करण्याआधीच फॉर्म भरण्यासारखी कामे करावी लागतात. तर इतर प्रकारच्या सबसिडी साठी प्रोजेक्ट उभा राहिल्यानंतर प्रोसेस करावी लागते.
जर तुम्ही एखादा ट्रेडिंग किंवा रिटेल व्यवसाय निवडला असेल तर खालील स्टेप घ्या
a . योग्य व्यवसाय निवाडा. तुमच्या भागातील परिस्थिती, गुंतवणूक क्षमता, मार्केट स्थिती, परिसरातील ग्राहकांची मानसिकता यासारख्या विविध बाबींवर व्यवसाय निवड ठरते.
b . त्यासाठी आवश्यक जागेकरिता योग्य जागी शॉप विकत किंवा भाड्याने मिळवा.
c . निवडलेल्या व्यवसायासाचा माल, वस्तू कुठे मिळतो याची माहिती काढा. उदा. कपड्यांचे शॉप ठरवले असेल तर ठोक भावात कपडे कुठे मिळतात याची माहिती काढावी. हे मार्केट देशभरात कुठेही असू शकते. हे एक तर व्होलसेल मार्केट असतं किंवा ब्रँडेड प्रोडक्ट साठी डिस्ट्रिब्युटर्स.
d . मिळालेल्या माहितीनुसार त्या त्या मार्केट मध्ये जाऊन एक दोन दिवस निरीक्षण करावं. त्यानंतर काही व्होलसेल विक्रेत्यांशी चर्चा करून रेट, क्वालिटी ची माहिती घ्यावी. आणि मग मुखय खरेदीला सुरुवात करावी. सगळी खरेदी लगेच करू नये. टप्प्याटप्प्याने हि खरेदी करावी.
e . शॉप डिझाईन करून सेटअप करावे. गुंतवणुकीची क्षमता असेल तर चांगल्या डिझायनर कडून शॉप डिझाईन करून घ्या.
f . शॉप ची रचना आकर्षक करा. लोकांकडून मते जाणून घ्या. त्यानुसार सेटअप करा
g . जर तुमची आर्थिक क्षमता चांगली असेल तर शॉप पूर्णपणे सेटअप झाल्यानंतर उदघाटनाची ची तयारी करावी. यापूर्वी परिसरात चांगल्या प्रकारे जाहिरात करून वातावरण निर्मिती करावी.
h . कर्मचारी भरती करून घ्यावी. त्यांना योग्य ते प्रशिक्षण द्यावे. प्रशिक्षण म्हणजे खूप मोठं काही नाही, फक्त ग्राहकांशी कसे वागावे, ग्राहक कसे हाताळावेत, विक्रीची कला, बोलण्याची पद्धत यासंबंधी महती द्यावी.
i . उदघाटन करताना शक्य होईल तेवढे भव्य करावे. प्रेझेंटेशन कोणत्याही व्यवसायासाठी खूप महत्वाचे असते.
हि झाली व्यवसायाची सुरुवात. आता तो कायमस्वरूपी चांगल्या प्रकारे सुरु राहण्यासाठी तुम्ही स्वतःला त्याप्रमाने तयार करणे आवश्यक आहे. ज्यासाठी मार्गदर्शनापेक्षा तुमच्या स्वयंशिक्षणाची आवश्यकता आहे. व्यवसाय सुरु केल्यानंतर तुम्ही आपोआपच व्यवसायाचे गुण शिकत असता. त्यासाठी कोणत्याही प्रशिक्षणाची गरज नसते. फक्त एक नियम ध्यानात ठेवा. व्यवसाय सुरु केल्यानंतर उगाच नफ्या तोट्याचे हिशोब मांडत बसू नका. कोणत्याही व्यवसायासाठी पहिली तीन वर्षे खूप महत्वाची असतात. या काळात पहिल्या दोन वर्षात नफ्या तोट्याचा हिशोब मांडत बसण्यापेक्षा ग्राहक वाढवण्याकडे लक्ष द्यायचे असते. तुम्ही ग्राहकांवर लक्ष केंद्रित करा नफा आपोआपच होणार असतो.
३. कायदेशीर व शासकीय बाबींची पूर्तता -
कोणताही व्यवसाय सुरु करताना त्यासंबंधी कायदेशीर व शासकीय बाबींची पूर्तता काटेकोरपणे पूर्ण करून घ्यावी. व्यवसायानुसार आवश्यकता बदलू शकते. त्यासंबंधी संबंधित खात्यातून माहिती मिळते. तसेच व्यवसाय सुरु करताना इतरही कायदेशीर बाबींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
a ) व्यवसायाची योग्य प्रकारे नोंदणी करून घ्यावी
b ) लायसन्स ची आवश्यकता असल्यास संबंधित खात्याकडून लायसन्स काढून घ्यावे. यासाठी आता ऑनलाईन फॉर्म भरावे लागतात. ते एखाद्या सेवा पुरवठादाराकडून (उदा. महा ई सेवा केंद्र) भरून घ्यावे.
c ) व्यवसायाची जागा भाडेकराराने असेल तर त्याचा योग्य तो करार करून घ्यावा. हा करार किमान नोटराइज्ड करून घ्यावा.
d ) कोणतेही आर्थिक व्यवहार करताना त्याची योग्य नोंद ठेवा. जर एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर त्याच्याकडून चेक घेऊन ठेवावा, तसेच एका कागदावर दोन रुपयांचा स्टॅम्प लावून त्यावर आर्थिक व्यवसाहाराची नोंद करून सही घ्यावी. यासाठी स्टॅम्प पेपर ची गरज नाही.
e ) शासकीय स्तरावर कोणत्याही प्रकारचे अर्ज करताना, निवेदन करताना, कागदपत्रे जमा करताना, व्यवहार करताना पोहोच घ्यायला विसरू नये.
f ) कोणताही करार करताना शक्यतो वकीलांशी सल्ला मसलत करावी. वकिलाला द्यावी लागणारी पाचशे-हजार रुपये फी वाचवण्याच्या नादात मोठ्या अडचणीत अडकू शकता. वकिलाच्या सहभागाशिवाय करार करणे टाळावे.
g ) शासकीय पूर्तता करताना सर्व गोष्टी काळजीपूर्वक कराव्यात. एखादी चूक तुम्हाला अधिकाऱ्यांच्या पाया पडायला भाग पडू शकते. काही होत नाही, मी आहे ना, करून घेऊ अशा प्रकारचे सल्ले देणाऱ्यांपासून दूर राहा.
४. ग्राहक कसा शोधावा व जोडावा ? मार्केटिंग & सेल्स विषयी थोडक्यात...
ग्राहक शोधणे आणि जोडणे हा व्यवसायाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. ग्राहक जोडणे म्हणजे मार्केटिंग. ग्राहक जोडणे अवघड काम नाही, पण बसल्या जागी करण्यासारखे सुद्धा नाही. उद्योजकाचा सर्वात जास्त वेळ हा मार्केटिंग & सेल्स वर खर्च झाला पाहिजे, ना कि उत्पादनावर. उत्पादनासाठी कर्मचारी असतात, सुपरवायजर असतात. उद्योजकाने विक्रीवर लक्ष केंद्रित करायचे असते.
मार्केट कसे शोधावे, कसे जोडावे यासाठी काही स्टेप्स लक्षात ठेवा.
a ) आधी तुम्ही जे उत्पादन निवडले आहे त्याचा वापर कोणकोणत्या क्षेत्रात होतो याची माहिती करून घ्या.
म्हणजे, रिटेल मार्केट, इतर कंपन्यांना कच्चा माल म्हणून, निर्यात ई.
b) त्यानुसार तुमच्या उत्पादनाचे मार्केट कोणकोणते याची यादी बनवा.
c) निवडलेल्या क्षेत्रातील अपेक्षित ग्राहकांची यादी तयार करा. त्यांची वर्गवारी करा.
उदा. एखादी फूड प्रोसेसिंग कंपनी सुरु करत असाल तर त्याचे अपेक्षित ग्राहकांची वर्गवारी खालीलप्रमाणे असेल
>> ते प्रोसेस्ड फूड आपल्या उत्पादनात वापरणाऱ्या इतर कंपन्या
>> त्या उत्पादनाचे स्थानिक जिल्ह्यातील व बाजारपेठेतील दुकानदार, किरकोळ विक्रेते
>> त्या उत्पादनाचे २००-४०० किमी परिसरातील मार्केटमधील ठोक विक्रेते व डिस्ट्रिब्युटर्स
>> मोठ्या शहरातील मोठ्या मार्केटिंग कंपन्या व एजंट्स
>> इतर मोठ्या कंपन्या ज्या तुमच्याकडून नॉन-ब्रँडेड प्रोडक्ट घेऊ शकतात
>> थेट ग्राहक उदा. हॉटेल, घरगुती ग्राहक ई.
d ) अपेक्षित ग्राहकांची यादी बनवायला सुरुवात करा व वर दिलेल्या अपेक्षित ग्राहकांच्या रचनेनुसार सर्व माहिती गोळा करा
हि माहिती गोळा करण्यासाठी प्रत्यक्ष फिरावं लागेल, रेफरन्स घ्यावे लागतील, तसेच इंटरनेट वरूनही बरीचशी माहिती गोळा होते.
e) गोळा केलेल्या माहितीचा अभ्यास करून प्रत्येक वर्गातील अपेक्षित ग्राहकांना त्यांच्या व्यवसाय क्षमतेनुसार क्रमांक, किंवा कॅटेगरी द्या
उदा. अ, ब, क, ड ई.
म्हणजे वर पहिल्याप्रमाणे फूड प्रोसेसिंग प्रोजेक्ट असेल तर पहिला अपेक्षित ग्राहक म्हणजे ते प्रोडक्ट कच्चा माल म्हणून वापरणाऱ्या कंपन्या. या कंपन्यांची पहिली वर्गवारी करून यादी तयार केल्यानंतर त्यात पुन्हा मोठ्या कंपनीपासून लहान कंपनीपर्यंत विभागणी करून त्यांचे गट (अ ब क ड) तयार करावेत.
(Category >> Sub-category)
यामुळे तुम्हाला कुणाकुणाला भेटायचं याच योग्य नियोजन करता येतं. आणि मुख्य म्हणजे एक दोन अपेक्षित ग्राहकांना भेटून तुम्ही थांबत नाही. कारण तुमच्यासमोर फक्त एक यादी नसते तर विविध कॅटेगरी मधील १०-२० याद्या समोर असतात. प्रत्येक यादीमधील २-२ जणांना भेटायचं म्हटलं तरी खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही ग्राहकांशी संपर्क करता. हि यादी तयार झाल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर किमान हजारभर अपेक्षित ग्राहक असल्याचे तुमच्या लक्षात येईल.
हि पद्धत त्रासदायक वाटली तरी प्रभावी आहे.
f ) हि वर्गवारी करून झाल्यानंतर, ग्राहकांची यादी तयार झाल्यानंतर प्रत्यक्ष भेटी गाठींना सुरुवात करावी
g ) ग्राहक शोधण्याची पायरी संपल्यावर ग्राहक जोडण्याची पायरी सुरु होते. यात तुम्हाला तुमच्या सर्व अपेक्षित ग्राहकांना भेटून आपले उत्पादन सांगणे आवश्यक असते. तुमचा व्यवसाय लहान स्तरावर असेल तर हे काम तुम्हाला स्वतः करावे लागू शकते. पण शक्यतो तुम्ही जे प्रोडक्ट निवडले आहे त्या क्षेत्रात काम करणारा एखादा सेल्स एक्झिक्युटिव्ह लगेच कामावर ठेवावा, व त्याच्या कडून हे मार्केट जोडण्याचे काम करून घ्यावे. या व्यक्तीला पगार जास्त द्यावा लागला तरी चालेल पण तो आधीच त्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्याच्याकडून लगेच मार्केट मिळून जाते.
h) तयार केलेल्या यादीमध्ये प्रत्येक यादीमधील किमान दोन ग्राहकांना जोडण्याचे टार्गेट ठेवा. प्रत्येकाला प्रत्यक्ष भेटून आपले उत्पादन सांगा, त्यांना सॅम्पल द्या. त्यांना काय हवंय काय नको याही माहिती घ्या.
i ) पहिल्या भेटीनंतर दोन तीन दिवसात पुन्हा दुसरी भेट द्या. यावेळी प्रत्यक्ष विक्रीसाठी प्रयत्न करा. तुमच्या विक्री प्रतिनिधीमुळे तुम्हाला प्राथमिक मार्केट मिळायला सुरुवात झालेली असते. आणि या यादी पद्धतीने काम केल्यामुळे ग्राहक संख्येसोबतच तुमचे क्षेत्र सुद्धा वाढायला लागते.
j ) एक मात्र लक्षात ठेवा... मार्केट मिळण्यासाठी वेळ लागतो. हे काय चुटकीसरशी होणारे काम नाही. पहिले एक वर्ष तुम्हाला मार्केट सापडायला आणि जोडायलाच लागत असते. जसजसे तुम्ही मार्केटमधे स्थिरावता तसतसे तुम्हाला ग्राहक मिळत जातात. त्यामुळे मार्केटिंग करताना संयम आवश्यक आहे.
५. ब्रँड तयार करताना
ब्रँड हा कोणत्याही व्यवसायासाठी आवश्यक असतो. तुमच्या उत्पादनाचे व्यवसायाचे नाव हीच तुमची ओळख असते. तुमचे एखादे दुकान असो किंवा एखादे मॅन्युफॅक्चरिंग युनिट. ब्रँड लागतोच. त्यामुळे ब्रँड च्या संबंधी काही गोष्टी लक्षात ठेवा.
a) उत्पादनासाठी किंवा व्यवसायासाठी नाव शोधताना त्या क्षेत्रात आधी कुठेही न वापरलेले नाव शोधा. यासाठी एखाद्या IPR कन्सल्टन्ट ची मदत घ्या, किंवा http://www.ipindia.nic.in या वेबसाईट वर ट्रेंड मार्क सर्च मधे शोध घ्या. बरेच जण इंटरनेटवर वेबसाईटकरीता डोमेन उपलब्ध आहे कि नाही यावर ट्रेड मार्क उपलब्ध आहे कि नाही याचा अंदाज घेतात. पण हि चुकीची पद्धत आहे. इंटरनेट वर नसलेले कितीतरी ब्रँड्स ट्रेक मार्क म्हणून नोंदवले गेलेले आहेत.
b) तुमची कंपनी XYZ या नावाने आहे. तुम्ही एखादे ज्यूस बाजारात आणणार आहात. तर अशावेळी तुमच्या कंपनीचे नाव म्हणजे तुमचा ब्रँड नसतो, तर तुम्ही त्या ज्यूस ला जे नाव देणार आहात तो तुमचा ब्रँड असतो. एकाच कंपनीचे कितीही ब्रँड्स असू शकतात.
c) एकदा ब्रँड निवडल्यानंतर त्याचा लोगो चांगल्या डिझायनर कडून तयार करून घ्यावा. घराच्या घरी पावर पॉईंट वर प्रयत्न करू नका, किंवा गावाकडच्या एखाद्या लग्नपत्रिका, समारंभ पत्रिका व बॅनर बनवणाऱ्याकडे जाऊ नका. ब्रँड खूप महत्वाचा असतो, त्यासाठी योग्य प्रोफेशनल डिझायनरच हवा.
d ) लोगो डिझाईन करून झाल्यानंतर त्याचा ट्रेड मार्क नोंदवून घ्या. ट्रेंड मार्क नोंदवण्यासाठी किमान दोन वर्षे लागतात. यासाठी बरेच डॉक्युमेंटेशन करावे लागते.
e) ट्रेड मार्क नोंदणी फक्त ४-५ हजारात असे तुम्ही बऱ्याच ठिकाणी वाचले असेल. पण या फसव्या जाहिराती आहेत. हे लोक फक्त ट्रेड मार्क अप्लिकेशन फाईल करतात. परंतु फक्त अप्लिकेशन फाईल करणे म्हणजे ट्रेड मार्क नोंदणी करणे नव्हे. यासाठी खूप कामे करावी लागतात. IP India च्या कार्यालयात जावे लागते, ऑब्जेक्शन वर उत्तरे द्यावी लागतात, बऱ्याचदा तुमचा ब्रँड हा तुम्हीच बनवलेला आहे चोरीचा नाही हे सिद्ध करावे लागते. यासाठी प्रोफेशनल IP कन्सल्टन्ट ची गरज असते. हे कन्सल्टन्ट १५-२० हजार पर्यंत फी घेतात. पण हेच खरे काम करतात. फक्त अर्ज केला आणि पुढे काहीच काम झाले नाही, आणि काही काळानंतर दुसऱ्या एखाद्याने तुमचा ब्रँड चोरून स्वतः नोंदवून घेतला तर आजपर्यंत तुम्ही तुमच्या ब्रँड साठी घेतलेले कष्ट पूर्णपणे पाण्यात जातात. काही वेळेला एखाद्या कंपनीकडून ट्रेडमार्क भंगाची नोटीसही येते, आणि अशावेळी तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळे ट्रेड मार्क नोंदणी करताना चांगले कन्सल्टन्ट शोधा.
f) यानंतर शक्य असल्यास तुमच्या व्यवसायाची वेबसाईट बनवून घ्या. वेबसाईटला प्रमोशन ची जोड द्या.
६. शासकीय योजना
जवळजवळ सर्व मॅन्युफॅक्चरिंग व सर्व्हिस व्यवसायांसाठी काहीनाकाही शासकीय योजना आहेत.
a) रु. २५ लाखांपर्यंत गुंतवणुकीच्या मॅन्युफॅक्चरिंग व रु. १० लाख गुंतवणूकीपर्यंतच्या सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी PMEGP अंतर्गत KVIC तर्फे १५ ते ३५% पर्यंत सबसिडी मिळते. ग्रामीण भागात हि सबसिडी २५ते ३५% आहे. https://www.kviconline.gov.in/ या वेबसाईटवर तुम्हाला यासंबंधी सर्व माहिती मिळेल.
b) याचबरोबरीने CLCSS अंतर्गत तुम्हाला मशिनरी किमतीवर १५% पर्यंत सबसिडी मिळते.
c) फूड प्रोसेसिंग प्रोजेक्ट असेल तर अतिरिक्त २५-५०% पर्यंत सबसिडी मिळू शकते. हि सबसिडी प्रोजेक्ट नुसार कमी जास्त होऊ शकते.
d) PSI २०१३ अंतर्गत तुमच्या प्रोजेक्ट वर २० ते ८०% पर्यंत सबसिडी मिळते. सबसिडीची प्रमाण प्रोजेक्ट कोणत्या भागात आहे यावर ठरते.
e) कापड उद्योगासाठी स्वतंत्र सबसिडी आहे. याला TUFF स्कीम म्हटले जाते.
PMEGP व्यतिरिक्त इतर सबसिडी साठी शक्यतो एखाद्या कन्सल्टन्ट च्या माध्यमातून काम करून घ्यावे. सबसिडीच्या मागे लागतात तर तुमचे व्यवसायावरही लक्ष उडण्याची शक्यता असते. म्हणून हि कामे कन्सल्टन्ट कडून करून घ्यावीत. कन्सल्टन्ट कडून काम करून घेण्याचा मुख्य फायदा म्हणजे कन्सल्टन्ट तुमच्या प्रोजेक्ट ला जास्तीत जास्त प्रकारात सबसिडी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करातात. यात तुमचाच फायदा असतो. काही वेळेला अगदी १००% पर्यंत सबसिडी मिळाल्याची उदाहरणे आहेत.
७. कर्जासंबंधी
व्यवसायासाठी कर्ज लागतेच असे काही नाही. उलट मी तर म्हणेल कि व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात कर्ज न घेता छोट्या स्तरावर व्यवसाय सुरु करा. तुम्ही जे प्रोडक्ट निवडले आहे त्याची आधी ट्रेडिंग करा. मार्केट तयार करा. दोन तीन वर्षे ट्रेडिंग करून व्यवसायाचे आर्थिक रेकॉर्ड चांगले तयार करा. आणि ज्यावेळी तुमचे मार्केट मोठ्या मॅनुफॅक्चरिंग प्रोजेक्ट च्या उत्पादन क्षमतेएवढे तयार होईल त्यावेळी मॅन्युफॅक्चरिंग चा विचार करा. अशावेळी तुमचे बँक रेकॉर्ड चांगले झालेले असते. तुमचा व्यवसाय बँकेला दिसत असतो. बँक तुम्हाला लगेच कर्ज देते.
तरीही जर असा प्रोजेक्ट असेल कि त्यासाठी गुंतवणूक लागणारच आहे, आणि कर्जाची आवश्यकता आहे तर या स्टेप्स फॉलो करा
a) आधी निवडलेल्या प्रोजेक्ट चा प्रोजेक्ट रिपोर्ट CA कडून तयार करून घ्या.
b) प्रोजेक्ट रिपोर्ट बनविण्यासाठी मशिनरी, कच्चा माल, कर्मचारी खर्च, बांधकाम खर्च इत्यादींची संपूर्ण माहिती घेऊन ठेवावी.
c) तुमचे CIBIL रेकॉर्ड चांगले राहील याची काळजी घ्या. सिबिल खराब असेल तर तुम्हाला कर्ज मिळू शकत नाही.
d) कर्जासाठी बँक तारण मागतेच. अशावेळी एखादी (शहर हद्दीतील किंवा ग्रामीण भागातील) NA प्रॉपर्टी तारण द्यावी लागते. त्याची तयारी असू द्यावी.
e) प्रोजेक्ट रिपोर्ट बँकेत जमा केल्यानंतर एक दोन भेटीत काम होत नसते. तुम्हाला सारखे सारखे बँकेत जाणे आवश्यक असते. मॅनेजरला वेळोवेळी भेटावे लागते. पाठपुरवठा करावा लागतो.
f) बँक मॅनेजर तुम्हाला व्यवसायाची माहिती आहे कि नाही याची खात्री करूनघेण्यासाठी तुम्हाला निवडलेल्या व्यवसायाविषयी वेगवेगळे प्रश्न विचारू शकतात. अशावेळी तुम्हाला संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.
g) जर तुम्ही एखाद्या व्यवसाय प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेतले असेल तर ते तुम्हाला कर्जासाठी मदत करतात.
i) कर्ज मंजूर होण्यासाठी २-३ महिने सुद्धा लागू शकतात. तेवढा वेळ वाट पाहण्याची तयारी ठेवा.
मंजूर झालेले कर्ज हे व्यवसायासाठी असते हे लक्षात ठेवा. पैशाची फिरवाफिरवी, इतर ठिकाणी पैसे वाळविणे टाळा. पैसे व्यवसायासाठीच खर्च करा. अनावश्यक खर्च टाळा. हफ्ते फेडण्याचे योग्य नियोजन करा.
८. व्यवसायासाठी पैसेच नसतील तर?
व्यवसायासाठी पैसा आवश्यक असतो. पण जर तुमच्याकडे पैसे नसतील तर काय हा प्रश्न उरतोच. अशावेळी तुमच्याकडे दोन मार्ग आहेत
a ) गुंतवणूकदार शोधा - तुम्ही व्यवसायासाठी गुंतवणूकदार शोधू शकता. याला आपण स्टार्ट अप फंडिंग म्हणून शकतो. पण अशा प्रकारच्या फंडिंग साठी तुमचा प्रोजेक्ट सुद्धा सर्वोत्तम असणे आवश्यक असते. एखादी चांगली व्यवसाय कल्पना, ऑफर, पेटंटेड प्रोजेक्ट असेल तर गुंतवणूकदार तुमच्या प्रोजेक्ट मध्ये पैसे गुंतवू शकतात. किंवा एखादा असा व्यवसाय असेल ज्यातील लहानातील लहान माहिती फक्त तुम्हालाच आहे आणि तुम्हीच फक्त तो सुरळीतपणे चालवू शकता, अशावेळी सुद्धा तुम्हाला फंडिंग मिळू शकते. यासाठी तुमच्याकडे स्किल असणे आवश्यक आहे. कारण गुंतवणूकदाराला त्याच्या पैशाशी मतलब असते, तुमच्याशी नाही. त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर योग्य रिटर्न मिळण्याची खात्री वाटली तरच ते गुंतवणूक करतात. यात फक्त तुमची भागीदारी सुरुवातीच्या काळात ५१% पेक्षा कमी होणार नाही याची काळजी घ्या.
b) जर तुमच्याकडे असा कोणताही स्पेशल प्लॅन नसेल, किंवा स्टार्टअप फंडींग च्या दृष्टीने तुम्ही अयोग्य असाल तर दुसरा मार्ग म्हणजे विविध कंपन्यांसाठी, व्यवसायिकांसाठी कमिशन बेसिस वर काम करणे. याला फ्रिलान्सर्स म्हटले जाते. किंवा ओळखीच्या अभाषेत एजंट्स म्हटले जाते. पण प्रोफेशनल शब्द फ्रिलान्सर्स आहे. पगाराचा त्रास नको म्हणून कित्येक कंपन्यांना, व्यवसायिकांना त्याच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी कमिशन बेसिस वर फ्रिलान्सर्स हवे असतात. तुम्ही अशा व्यवसायिकांना जॉईन होऊ शकता. कोणतीही गुंतवणूक न करता तुम्ही या लोकांना त्यांचे क्लायंट मिळवून देऊ शकता किंवा त्यांचे प्रोडक्ट विक्री करून देऊ शकता. याबदल्यात तुम्हाला ठरलेले उत्पन्न मिळेल. यात तुम्ही स्वतःचा व्यवसाय म्हणून सुरुवात करा. या सर्व कंपनी, व्यवसायिकांना तुमच्या ब्रँड सोबत जोडा. विना गुंतवणूक स्वतःचा व्यवसाय सुरु करा.
व्यवसाय इच्छा असेल तर मार्ग सापडतोच. असेच आणखी काही मार्ग तुम्ही स्वतःही शोधू शकता. खूप मार्ग आहेत. अडवळणात असल्यामुळे झाकोळले आहेत. त्यांचा शोध घ्या. व्यवसायासाठी कितीतरी पर्याय समोर उभे राहतील.
हे झाले व्यवसाय सु करण्यासंबंधी, त्यातील टेक्निकल माहितीसंबंधी, मार्केट संबंधी, प्रोसेस संबंधी...
आता व्यवसाय करताना आवश्यक असलेले काही महत्वाचे मुद्दे पाहूयात...
व्यवसाय करताना पाळावयाचे नियम...
१. जर तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यापूर्वी नफा किती मिळेल, महिना उत्पन्न किती मिळेल, व्यवसाय नाही चालला तर काय, कर्ज नाही मिळाले तर काय, सबसिडी किती मिळते, लहान व्यवसाय कसा सुरु करू ? लोक काय म्हणतील, असले प्रश्न पडत असतील तर ते विचार डोक्यातून तात्काळ काढून टाका. आणि हे विचार डोक्यातून काढून टाकणे शक्य नसेल तर व्यवसाय करण्याचा विचार सोडून द्या.
२. व्यवसाय विचारपूर्वक निवडा, एकदा व्यवसाय निवडल्यानंतर तो योग्य कि अयोग्य यासंबंधी उगाच इतरांशी चर्चा करू नका.
३. व्यवसायासंबंधी सल्ला व्यवसाय करणाऱ्याकडूनच घ्या, नोकरी करणाऱ्यांकडून नाही. जे लोक स्वतः व्यवसाय करायची हिम्मत करू शकलेले नाहीत ते तुम्हाला व्यवसायासंबंधी सकारात्मक प्रतिसाद देणार नाहीत.
४. व्यवसायाच्या पहिल्या दोन अडीच वर्षात व्यवसायातून येणारा पैसा स्वतःसाठी खर्च करू नका. तुम्हाला वरवर पाहता तुमच्याकडे येणारे महिन्याचे उत्पन्न तुमचा नफा वाटू शकते, परंतु प्रत्यक्षात ती व्यवसायातील गुंतवणूक फक्त रोख स्वरूवपात तुमच्या हातात आलेली असते. त्यामुळे तो पैसा खर्च न करता पुन्हा व्यवसायात गुंतवावा.
५. नातेवाईक किंवा मित्र यांना शक्यतो व्यवसायात सहभागी करुन घेऊ नका.
६. कुणासाठीही शब्द टाकु नका, कुणाचीही खात्री देऊ नका किंवा कुणावरही तात्काळ विश्वास ठेऊ नका.
७. स्वप्रतिमा नेहमी स्वच्छ राहील याची काळजी घ्या. तुम्ही तुमच्या व्यवसायाचे पहिले ब्रँड अँबेसेडर असता.
८. ऊधारीचा व्यवहार टाळण्याचा प्रयत्न करा. उधारी व्यवसायाचा अविभाज्य अंग असली तरी तिचे योग्य नियोजन असावे. एकूण उलाढालीच्या ३०% पेक्षा जास्त उधारी करणे टाळा. रिटेल व्यवसायात उधारी १००% बंद असते. मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायात उधारी येतेच, पण त्याचे नियोजन करा.
९. समाजसेवेसाठी व्यवसाय करायचा नसतो, व्यवसाय मोठा झाला की समाजसेवा आपोआपच होते.
१०. व्यवसायात मनमिळाऊ स्वभावासोबतंच निष्ठुरता सुद्धा महत्वाची असते. भावनिक होऊन व्यवसाय करता येत नाही. योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. भावनेच्या भरात व्यवसायाला नुकसान होईल असे निर्णय घेऊ नका.
११. कर्मचाऱ्यांना जिव लावा पण त्यांना डोक्यावर बसवु नका. कर्मचाऱ्यांना दिलेली सूट किंवा सेवा त्यांना हक्क वाटायला लागली कि तुमच्या व्यवसायाची अधोगती सुरु होत असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या जागीच ठेवा.
१२. गरज कधीही दाखवु नका, गरजवंताला नेहमीच लुबाडले जाते. व्यवहार करताना तुमच्या चेहरा हा नम्र पण निर्विकार असला पाहिजे.
१३. वेळप्रसंगी कठोर निर्णय घ्यायला कचरु नका.
१४. तुमच्या व्यवसायावर तुमचेच वर्चस्व असेल याची काळजी घ्या. व्यवसायाच्या मुख्य पदांवर मित्र नातेवाईक यांची नियुक्ती करणे टाळा.
१५. कोणत्याही परिस्थितीत आधी व्यवसायाचा विचार करा.
१६. व्यवसायावर मॅनेजर, सुपरवायजर नियुक्त असतील तर आर्थिक ताळेबंद वेळोवेळी स्वतः तपासा.
१७. व्यवसायातील महत्वाच्या निर्णयांची चर्चा सर्वांसमोर करु नका. व्यवसायातील गुप्तता काटेकारपणे पाळा.
१८. ऊद्योजकाने ऊद्योगाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यासारखे वागु नये. काम करावे, कर्मचाऱ्यात मिसळावे, त्यांच्याशी गप्पा माराव्यात, त्यांना आपलेसे करावे पण तुम्ही मालक आहात याची कर्मचाऱ्यांना जाणीव असलीच पाहीजे.
१९. स्वतःवर संयम ठेवा. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. गडबडू नका. संयम असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढू शकता.
२०. संभाषण कौशल्य आत्मसात करा. कमी बोलणे जास्त ऐकणे हे उत्कृष्ट संभाषण कौशल्याचे गमक आहे.
२१. व्यवसायात नुकसान होतच असते. नुकसानाला घाबरू नका. त्याला गुंतवणूक समजा व पुढे चालत राहा.
२२. तुमचे राहणीमान उद्योजकाला शोभेल असेच असायला हवे. ग्रामीण भागातील उद्योजक आहोत म्हणजे काहीतरी कमतरता आहे असे काही नाही. उद्योजक हा उद्योजकच असतो. त्यात कमी जास्त असे काहीच नसते. न्यूनगंड सोडा.
२३. ग्राहक हाताळणीमध्ये कुठेही कमी पडू नका. ग्राहक हा राजा असतो आणि राजाला कधीही दुखवायचे नसते.
२४. ब्रॅण्डिंग, मार्केटिंग, सेल्स हे तुमच्या व्यवसायाचे तीन मुख्य आधारस्तंभ आहेत. यांच्याकडे कधीच दुर्लक्ष करू नका.
२५. व्यवसायात स्पर्धा असतेच. उलट ज्या क्षेत्रात स्पर्धा नाही त्या क्षेत्रात व्यवसाय करूच नये. फक्त स्पर्धेचा कचरा झालेला असू नये. स्पर्धा नसलेले एकच क्षेत्र असते, तुमचे स्वतःचे नवीन प्रोडक्ट असावे जे आजपर्यंत मार्केटमध्ये आलेले नाही.
२६. व्यवसायात पैसा मिळतंच असतो. मार्केटमध्ये मिळणारी कोणतीह वस्तू कुणीतरी बनवतय म्हणून तुम्हाला मिळते आहे. आणि कुणीतरी बनवतय कारण त्याला त्यात नफा मिळतोय. व्यवसायात पैसा मिळतोच, फक्त थोडा धीर धारा.
२७. व्यवसाय करण्याची इच्छा मनातून जागी करा. बळजबरी व्यवसाय होत नाही, फक्त नोकरी होते. उद्योजक व्हायचे असेल तर नोकरीच्या मानसिकतेमधून बाहेर यावे लागते.
हि माहिती तुम्हाला कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी पुरेशी आहे. किमान व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी कमी होतील आणि तुम्हाला व्यवसायावर लक्ष केंद्रित करता येईल. प्रत्येक टप्प्यावर योग्य नियोजन करा व दिलेल्या नियमांचे पालन करा. माझ्या परीने जास्तीत जास्त माहिती थोडक्यात देण्याचा मी प्रयत्न केला आहे. हि माहिती तुम्हाला कमी येईल अशी अपेक्षा करतो.
मराठी तरुणांमध्ये उद्योजकांविषयी वाढत चाललेली जागरूकता अतिशय चांगली आहे, परंतु त्यांना अजूनही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परिसरात उद्योजकतेचे वातावरण नसते, चांगले ज्ञान प्राप्त करण्यासाठी आवश्यक आर्थिक क्षमता नसते, सल्लागार भेटत नाहीत, मराठी मानसिकतेत व्यवसायाविषयी अजूनही कायम असलेली नकारात्मक वृत्ती यासारख्या समस्यांमुळे तरुणाई अजूनही उद्योगांपासून लांब आहे. या तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास नक्कीच महाराष्ट्रातील भागात उद्योजकतेचे वारे वाहायला लागेल. यासाठी सर्वंकष प्रयत्न होणे आवश्यक आहे. शासकीय स्तरावरून प्रयत्न होणे आवश्यक आहे. एखादे प्रोडक्ट बनवण्याचे प्रशिक्षण देणे म्हणजे व्यवसाय मार्गदर्शन होत नाही. व्यवसाय मार्गदर्शन म्हणजे व्यवसाय कसा करावा याचे मार्गदर्शन. प्रोडक्शन हे कामगारांचे काम आहे, मार्केटिंग & सेल्स हे उद्योजकांचे मुख्य काम आहे. नवउद्योजकांना मार्केटिंग & सेल्स मध्ये तयार करणे हि मुख्य गरज आहे. मराठी तरुणांमध्ये वाढत चालली व्यवसायाची इच्छा हि येत्या काळात होणाऱ्या मोठ्या परिवर्तनाची पायाभरणी आहे. हा पाय पक्का करणे आवश्यक आहे. यासाठी सर्व स्तरातून प्रामाणिक प्रयत्न होणे आवश्यक आहे. व्यवसाय अवघड नाही, फक्त नियोजन योग्य हवे.
उद्योजक व्हा...
समृद्ध व्हा...
___
श्रीकांत आव्हाड
www.shrikantavhad.com
sir aapan dileli mahiti khupch chhan ahe pn sir mla evdh sanga ki food processing vyavsayamdhye kuthun subsidy aani kshasathi milte
ReplyDeleteदिलेली माहिती खुप चांगली आहे सर......
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteखूप छान माहिती मिळाली. धन्यवाद
ReplyDeleteखूप छान माहिती मिळाली. धन्यवाद
ReplyDeleteखुप छान धनयवाद
ReplyDeleteखूप छान लेख, धन्यवाद.
ReplyDeleteVery nice Information sir.
ReplyDeleteखूप छान माहिती
ReplyDeleteSir, khup chan margdarshen kelat thank you.
ReplyDeleteखूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
ReplyDeleteखूपच छान माहिती दिली सर.धन्यवाद.
ReplyDeleteसर
ReplyDeleteमी एक नवीन उद्योग सुरु करण्याच्या मानसिकतेत आहो. आपण दिलेली माहिती खुपच छान आहे. निश्चितच मला नवीन उद्योग सुरु करतांना उपयोगी पडेल.
खूप छान माहिती दिले सर धन्यवाद
ReplyDeleteअप्रतिम माहिती दिली सर आपण धन्यवाद
ReplyDeleteखुप छान माहिती दिलीत तुम्ही
ReplyDelete