मार्केटिंगला भुताटकी असल्यासारखं काय घाबरता ?

व्यवसाय संदर्भात सल्ला विचारण्यासाठी मला दररोज १०-१२ कॉल येतात. जवळजवळ ९०% तरुण असतात. बहुतेकांना व्यवसायाचा पूर्वानुभव नसतो. कित्येकांच्या पिढ्यानपिढ्या कुणीही व्यवसाय केलेला नसतो. पण नोकरी मिळत नाही म्हटल्यावर व्यवसायाशिवाय पर्यायच रहात नाही. तसही ३० लाख बेरोजगार असणाऱ्या या राज्यात तरुणांना व्यवसायाशिवाय पर्याय नाही. म्हणून मी सुद्धा माझ्या परीने तरुणांमध्ये व्यवसायाची इच्छा निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करत असतो. 

पण व्यवसायाची माहितीच नसल्यामुळे ८०% मुले व्यवसायाच्या पहिल्याच फेरीत गारद होतात. यांचे प्रश्न किंवा शंकाही खूप गमतीदार असतात. काही उदाहरणे या मुलांच्याच भाषेत पाहू

१. आपल्याला असा व्यवसाय करायचा ज्यात खूप प्रॉफिट असतो. 
२. आपल्याला घर बसल्या व्यवसाय सांगा. आपण बनवू कुणीतरी येऊन माल घेऊन जावा. 
३. मी व्यसाय करतो पण तुम्ही विक्रीची गॅरंटी देणार का ?
४. कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारा व्यवसाय सांगा. 
५. माल विकायला फिरावं लागलं व्हय ?
६. तुम्हीच घ्याना साहेब माझ्याकडून माल. 
७. कंपनी सुरु केल्यावर लगेच डिस्ट्रिब्युटर भेटला पाहिजे. 
८. माल विकला जाईल का ? 
९. मार्केटिंग पण आम्हालाच करावी लागेल का?
१०. मी बनवतो काय बनवायचं ते पण तुम्ही मशीन द्या आणि तुम्हीच विकत घ्या. 

हि काही उदाहरणे आहेत व्यवसायाबद्दल मुलांच्या शंकांची आणि प्रश्नांची... यासारख्या कित्येक प्रश्नांना मला दररोज तोंड द्यावे लागते. प्रत्येक प्रश्नाला समाधानकारक उत्तर द्यावे लागते. व्यवसायाबद्दल त्यांचा दृष्टिकोन किती चुकीचा आहे हे समजावून सांगावे लागते. पण व्यवसायाची काहीच माहिती नसल्यामुळे या शंका रास्त आहेत हे मलाही माहित आहे. त्यामुळेच मी या मुलांना योग्य मार्गदर्शन मिळेल आणि त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील याची काळजी घेतो. 

पण तरीही सर्वात जास्त प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे, मुलांमध्ये असलेली मार्केटिंग किंवा विक्रीची भीती. ज्यावेळेस मी सांगतो कि उत्पादनाशी निगडित नवीन व्यवसाय सुरू केल्यावर तुम्हाला मार्केटिंग व विक्रीसाठी तुमच्या परिसरात फिरावे लागेल, उत्पादनानुसार त्याच्या अपेक्षित वितरकांकडे, दुकानदारांकडे व्यक्तिशः जावे लागेल तेव्हा त्यांचा लगेच प्रश्न असतो साहेब मार्केटिंग पण आम्हालाच करावी लागेल का? आम्ही माल बनवून देतो तुम्ही शोध कि कुणीतरी होलसेलर. अशावेळेस मला सांगावेच लागते कि तुम्हाला मार्केटिंग करणे भाग आहे, होलसेलर भेटतील पण लगेच नाही, स्वतःचे मार्केट डेव्हलप करायलाच हवे. इतकं सांगितल्यावर आत्तापर्यंत उत्साहात बोलणाऱ्या नवउद्योजकाचा आवाज एकदम खाली येतो आणि "ठीक आहे साहेब, करतो मग नंतर फोन" असं बोलून कॉल बंद करतो. 

का आहे मार्केटिंग ची भीती मनात आपल्या ? मार्केटिंग म्हणजे काय भुताटकी आहे का ? का घाबरता मार्केटिंग ला एवढं ? जे सगळ्या जगाला जमत ते मार्केटिंग स्किल आपल्याला का जमू नये? एवढा काय आहे मार्केटिंग मध्ये कि आपल्याला त्याची दहशत वाटावी ? 
मार्केटिंग हा व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे. मार्केटिंग शिवाय व्यवसायाची कल्पना म्हणजे श्वासाशिवाय जगणं... दोनीही शक्य नाही. मी गमतीने म्हणतो, तुम्ही कॉलेज जीवनात दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी जे जे करता त्याला मार्केटिंग म्हणतात. तुम्ही लहानपणी आई बाबांना एखादी खेळणी घेण्यासाठी ज्या पद्धतीने प्रवृत्त करता त्याला मार्केटिंग म्हणतात. तुम्ही ददरोज समोरच्या व्यक्तीला तुमच्यातले चांगले गुण दाखवण्यासाठी धडपडता त्याला मार्केटिंग म्हणतात. एखाद्या कार्यक्रमात तुम्ही चांगले कपडे, पॉलिश केलेले शूज घालून जाता ... कशासाठी? यालाही मार्केटिंग म्हणतात. मार्केटिंग म्हणजे तुमचे उत्पादन प्रभावीपणे लोकांपर्यंत पोचवणे. मग ते कोणतेही असो. तुमचे नाव असो, किंवा तुमचा चेहरा असो, किंवा तुम्ही बनवत असलेली एखाद वस्तू असो. वेगवेगळ्या प्रकारे आपण दररोज शेकडो मार्गाने मार्केटिंग करत असतो. 

उत्पादन क्षेत्रातही असंच आहे. तुम्ही एखादी वस्तू बनवत असाल तर ती विकण्यासाठी मार्केट मधे स्वतः जावेच लागेल. उद्योग म्हणजे वस्तू बनवणे नव्हे तर विकणे. बनवायचं काम कामगारांचं असतं, विकण्याचं काम उद्योजकच असतं. मला मान्य आहे आपल्याला मार्केटिंगची काहीच माहिती नाही. एखाद्या दुकानात, ग्राहकाकडे जाऊन आपले उत्पादन विकण्यात आपल्याला अवघडलेपणा येतो. पण म्हणून आपण व्यवसायाचं करायचा नाही याला काय अर्थ आहे ? ज्या गोष्टी आपल्याला जमत नाही त्या गोष्टी शिकून घ्याव्याच लागतील. मार्केटिंग शिकणं अवघड नाही, खूप सोप्प आहे, फक्त शिकण्याची वृत्ती हवी. व्यवसाय करायचा तर त्याच्याशी संबंधित सर्व काही स्किल आपल्याला अवगत करावेच लागेल. मार्केटिंग व्यवसायाचा श्वास आहे त्याशिवाय व्यवसाय शून्य आहे, मृतवत आहे. घरबसल्या फक्त हमाली होते व्यवसाय नाही. व्यवसाय करायचा असेल , उद्योजक बनायचे असेल तर मार्केटिंग ची कला अवगत करावीच लागेल. मार्केटिंग भुताटकी नाही तर ती तुमच्या व्यवसायाची अर्धांगिनी आहे. 

**********

श्रीकांत आव्हाड 

Comments

  1. मार्केटिंग व्यवसायाचा आत्मा आहे हे मला वरील पोस्ट वाचल्यावर कळालं. जो पर्यंत मार्केटिंग ची ज्योती जळत राहते तो पर्यंतच व्यवसायाचा आयुष्य म्हणायला हरकत नाय माझं मत बनलाय.... आभारी आहे

    ReplyDelete

Post a Comment