'रिलायन्स जिओ' चे ग्राहक जोडण्याचे आक्रमक तंत्र

रिलायन्स जिओ का देतंय इतक्या स्कीम ? परवडत असेल का त्यांना ? इतकी स्वस्त सेवा दिल्यानंतर काहीतरी नफा शिल्लक रहात असेल का?
कित्येकांना रिलायन्स जीओ चे प्लॅन ऐकल्यानंतर असे प्रश्न पडले होते. रिलायन्स जीओ ने लॉन्चिंग ला जाहीर केलेले प्लॅन बघून कित्येक प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. रिलायन्स जीओ चे सिम खरेदी करण्यासाठी दुकानाबाहेर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. रिलायन्स जीओ ची तुफान विक्री होत आहे.

पण याचवेळेस मुख्य प्रश्न पडतो तो म्हणजे रिलायन्स ला इतकी स्वस्त सेवा द्यायला कसे परवडत असेल. मार्केटिंग ची खरी मेख इथेच आहे. कोणत्याही नवीन व्यवसायाचा किंवा उत्पादनाचा पहिला टप्पा असतो तो म्हणजे ग्राहक जोडण्याचा, दुसरा टप्पा असतो ग्राहक टिकवून ठेवण्याचा आणि तिसरा टप्पा असतो ग्राहक वाढवण्याचा. ग्राहक जोडण्याचा पहिला टप्पा अतिशय महत्वाचा असतो. अशावेळेस फायदा नुकसान याचा विचार करायचा नसतो. लक्ष्य फक्त एकंच असले पाहिजे ते म्हणजे ग्राहक जोडण्याचे. मग त्यासाठी एखादी वस्तू फुकट वाटण्याची वेळ आली तरी हरकत नाही, पण तुमचे उत्पादन ग्राहकाच्या हातात पडेल याची दक्षता घेणे आवश्यक असते. एकदा ग्राहकाने तुमचे उत्पादन घेतले कि तो आपोआपच तिचा वापर करणार असतो आणि अर्थातच भविष्यात त्याच्या माध्यमातून तुमचा ग्राहक वर्ग वाढणार असतो. रिलायन्स आत्ता याच पहिल्या टप्प्यावर काम करतंय. भरमसाठ स्कीम देऊन रिलायन्स ने लाखो ग्राहक एकाच महिन्यात जोडले आहेत. यातील कित्येक जण रिलायन्स चे सिम ३-४ महिन्यासाठीच वापरणार आहेत पण भविष्यात यातील ७०% ग्राहक जरी कमी झाले तरी उरलेले ३०% ग्राहक हे रिलायन्स चे कायमचे ग्राहक असतील, आणि हाच रिलायन्सचा पहिला हक्काचा ग्राहक असेल, म्हणजेच रिलायन्स ने दुसरा टप्पा पार केलेला असेल. हा ग्राहक कधीही कमी होणार नाही. उलट या ग्राहकांच्या माध्यमातून कंपनीला भविष्यात चांगला ग्राहक वर्ग मिळणार आहे. हा महत्वाचा तिसरा टप्पा असणार आहे. आणि एकदा ग्राहक जोडण्याचे प्रथम उद्दिष्ट पूर्ण झाले कि मग कंपनी या ग्राहकांकडून तिचा अपेक्षित नफा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

थोडक्यात अतिशय आक्रमक मार्केटिंग हे आजच्या काळात व्यवसायाची गरज आहे. या मार्केटिंगच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेला ग्राहक कायमस्वरूपी नसला तरी त्यातील १०-२०% जरी कायम झाले तरी तुम्हाला त्यांच्या कडून भविष्यात फायदा होणार असतो. म्हणूनच व्यवसायाच्या पहिल्या काळात नफा नुकसानीचा विचार न करता तुमची वस्तू ग्राहकाच्या हातात कशी पडेल याची काळजी घ्या. यातून तुमचा कायमस्वरुपी ग्राहक वर्ग ३०% च धरून चला आणि कालांतराने (एकदा तो ग्राहक स्पष्ट झाल्यावर) त्यांना योग्य प्रकारे सेवा देऊन त्यांच्या माध्यमातून नवीन ग्राहक जोडण्याचा प्रयत्न करा. तुमचा खरा व्यवसाय हा या तिसऱ्या टप्प्यात सुरु झालेला असतो. आणि या मार्गाने गेल्यास अपयश तुमच्याजवळ येण्यास अपयशी ठरते.

**********

श्रीकांत आव्हाड


Comments