उद्योजक व्हायचंय? मग स्वतःची बुद्धिमत्ता वापरा.



»»» एक काम करायचंय

पहिला - काम कसं करायचं सांगा मी करुन देतो

दुसरा - काम काय आहे सांगा, मि माझ्या पद्धतीने पुर्ण करतो

पहिला कर्मचारी आहे, दुसरा ऊद्योजक «««

कर्मचारी दुसऱ्याच्या सांगण्यानुसार वागतो,
ऊद्योजक स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवतो.

आपल्यातले ९५% कर्मचाऱ्याच्या मानसिकतेमधे आहेत.. साधी रजीस्ट्रेशन ची वेबसाईट शोधण्याची सुद्धा आपली तयारी नसते.

नोंदणीची वेबसाईट सांगा, लायसन्स ची वेबसाईट सांगा, फाॅर्म भरुन द्या, मशीनरी सप्लायरचे नंबर द्या, कच्च्या मालाचे स्रोत सांगा, प्लँट ऊभा करुन द्या, मार्केट बनवुन द्या.... अरे सगळं आम्हीच करायचं का ? तुम्ही काहीतरी करा !!!

बाळ रांगल नाही तर पायावर भक्कमपणे काधिच ऊभं राहु शकत नाही, कारण त्याच्या पायात ऊभे राहण्याची ताकदंच तयार झालेली नसते... आपलंही तसंच आहे, समोरच्याने जन्मापासून आपल्यालआ कडेवर घेऊन फिराव असं आपल्याला वाटतं...  पण ज्यादिवशी तो तुम्हाला खाली सोडेल त्यादिवशी तुम्ही जागचे हलू सुद्धा शकणार नाही. कारण तुम्ही पांगळे झालेले असता. तुम्ही स्वतः चालण्याची तसदी कधी घेतलेलीच नसते.

समाज तुमचा प्रश्न आहे कि नोंदणी कोणती करावी ? माझं उत्तर असेल लघुद्योगासाठी उद्योग आधार वर नोंदणी करा... हे प्रश्न आणि उत्तर दोनीही योग्य आहे. पण आता जर तुम्ही विचारला कि सर उद्योग आधार काय आहे आणि त्यावर नोंदणी काही करावी ? तर हा प्रश्न तुमच्या बुद्धिमत्तेची कमतरता दर्शवणारा आहे. कॉम्प्युटर सुरु करा, उद्योग आधार काय आहे सर्च करा, वेबसाईट सापडतेच. स्वतः फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. माझ्या पहिल्या कंपनीचा "SSI पार्ट १" (म्हणजेच आत्ताच उद्योग आधार) चा कागदी फॉर्म भरताना मला ६ वेळा फॉर्म भरावा लागला होता. पाच वेळा चुकला म्हणून फाडून टाकावा लागला होता. पण सहाव्यांदा प्रयत्न यशस्वी झालाच ना? इथे फॉर्म हे फक्त उदाहरणादाखल आहे. पण हा नियम प्रत्येक कामासाठी लागू होतो. स्वतः माहिती घ्यायला प्राधान्य द्या. स्वतः शिकण्याला प्राधान्य द्या.

उद्योजक तोच असतो जो स्वतः स्वतःचा व्यवसाय उभा करतो. सल्लागाराच्या मार्गदर्शन असावं ना, सहकार्य सुद्धा असावं, मदतही असावी, पण त्याने सगळा व्यवसायच उभा करावा, चालवून द्यावा आणि सेटल करून द्यावा अशी अपेक्षा असू नये. आयतं काहीतरी मिळावं असा विचार करत असाल तर व्यवसायाचं करू नका. कारण व्यवसाय सुरु करण्याचा, उभा करण्याचा, चालवण्याचा अनुभव नसेल तर तुम्ही तो व्यवसाय पुढे कधीच नेऊ शकत नाही. कशाला उगाच पैशाची नासाडी करताय? त्यापेक्षा ते पैसे FD करा आणि दरवर्षी येणाऱ्या व्याजावर गुजराण करा.

एकदा व्यवसाय करायचं ठरवलं कि त्याबरोबरीने येणाऱ्या जबाबदाऱ्या हाताळण्याची सुद्धा तयारी असावी लागते. स्वतःची कल्पनाशक्ती वापरावी लागते. स्वतः मार्ग शोधावे लागतात. सांगकामे कधी उद्योजक होऊ शकत नाही. उद्योजकाने दुसऱ्यांच्या सांगण्यावर वागायचं नसतं. स्वतःची बुद्धिमत्ता वापरायची असते.

मला येणाऱ्या कॉल पैकी ९०% कॉल हे आयत मिळावं अशी अपेक्ष करणारे असतात. मी त्यांचा अख्खा व्यवसाय उभा करून द्यावा अशी त्यांची अपेक्षा असते. हे मला अशक्य नाही. यासाठी मी भरपूर शुल्क घेतो. पण ते चुकीचं आहे हे मला माहितीये.  माझ्यासाठी नाही त्या उद्योजकांसाठी हे चुकीचं आहे. व्यवसाय सुरु करताना येणाऱ्या छोटछोट्या समस्या स्वतः सोडवल्या नाही तर भविष्यात येणाऱ्या मोठ्या समस्यांसाठी मानसिक, बौद्धिक तयारी कशी होईल ? दरवेळी तुम्हाला अडचणीतून सोडवणारा सोबत असेलच असे नाही. त्यासाठी तुम्ही स्वतः तयार असले पाहिजेत, आणि हि तयारी सुरुवातीच्या खस्ता खाऊनच होऊ शकेल.

स्वतः शिकण्याचा प्रयत्न केला तरंच स्वयंपूर्ण होताल ना ? किती दिवस कुबड्यांचा आधार शोधत फिरणार आहात ? स्वतःला व्यवसायासाठी तयार करा. आखाड्यात उतरण्यासाठी शरीर जसं आधी भरदार करावं लागतं, तसंच व्यवसायात उतारण्याआधी स्वतःला मानसिकतेने, अभ्यासाने, आत्मविश्वासाने तयार करावं लागतं. आधी स्वतःला व्यवसायासाठी मानसिकदृष्ट्या तयार करा. व्यवसाय म्हणजे काय हे समजून घ्या. व्यवसाय करायचा म्हणजे नक्की काय करायचे हे समजून घ्या. व्यवसायाची बाराखडी समजून घ्या.

व्यवसाय उभारण्यासाठी नाही व्यवसाय चालवण्यासाठी कौशल्य लागतं हे लक्षात घ्या.

उद्योजक व्हा...
समृद्ध व्हा...
______

श्रीकांत आव्हाड

Founder & Director
     > Roslin Business Solution
     > उद्योजक मित्र  

http://udyojakmitra.blogspot.in
https://www.facebook.com/udyojakmitra

Comments