मोठे उद्योजक शक्यतो गरिबीतूनच आलेले का असतात ? कधी विचार केलाय ?


मोठ्या उद्योजकांमध्ये अतिशय गरिबीतून आलेल्या उद्योजकांची संख्या सर्वात जास्त असते असे का ? कधी विचार केलाय ?

याचे कारण शोधायचा प्रयत्न केल्यास तुमच्या लक्षात येईल कि, व्यवसाय सुरु करताना यांना कुणाचीही मदत मिळालेली नसते. गरिबीमुळे सर्व कामे स्वतःच करावी लागतात, आणि सुरुवात करताना काहीतरी व्यवसाय करायचाय या भावनेतून त्यांनी व्यवसाय सुरु केलेला असतो. एखाद्या ठिकाणी नोकरी करत असताना यांनी हळूहळू व्यवसायाच्या दृष्टीने ज्ञान मिळवून त्यानंतर स्वतःचा छोटामोठा व्यवसाय सुरु करतात. यामुळे व्यवसाय कसा करायचा याच पुरेसं ज्ञान यांनी मिळविलेले असते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोण काय म्हणेल याची लाज वाटायचं काही कारण नसतं, हे लोक कुणाच्या खिजगणातीत नसतात. मध्यमवर्गीयांचे निम्मे आयुष्य लोक काय म्हणतील याचा विचार करण्यातच जातो. स्वतः माहिती मिळवणे, स्वतः फिल्ड वर काम करणे, कोणत्याही कामाची लाज न बाळगणे, व्यवसायाची पूर्ण माहिती मिळवणे, सुरुवात करताना कर्ज सबसिडी असल्या बिनकामाच्या लफड्यात न अडकता व्यवसायावर लक्ष केंद्रीत करणे या गुणांमुळे गरिबीतून आलेल्यांना व्यवसायात यश मिळवणे सोपे जाते. तसेच पैसे मिळविण्यासाठी काहीना काही चाललेली धडपड यांना खूप काही शिकवून जाते. यामुळे व्यवसायाचे वेगवेगळे मार्ग या लोकांसमोर निर्माण होतात. कित्येकदा अतिशय कमी वयात आलेली जबाबदारी या उद्योजकांना कमी वयात प्रगल्भ व्हायला मदत करते. काहीतरी करायचंय, पैसे कामवायचेत या भावनेतून सुरु केलेला छोटासा व्यवसाय मोठा उद्योग कधी बनतो हे त्यांच्या आणि समाजाच्या सुद्धा कधीच लक्षात येत नाही.

आपल्यासाठी व्यवसाय म्हणजे सबसिडी किती मिळेल, कर्ज किती मिळेल, नफा भरपूर पाहिजे, फिक्स ग्राहक पाहिजे, यशाची गॅरंटी काय, उत्पन्न किती मिळेल असल्या पांचट प्रश्नातच अडकून पडलेला आहे. हे प्रश्न आपल्यापैकी ९५% जणांना पडतात.. उरलेले ५% यशस्वी उद्योजक असतात. व्यवसाय सुरु करताना यापैकी एकाही प्रश्नाचा विचार करायचा नसतो. फक्त व्यवसाय करायचा असतो.

गिर्यारोहण करताना एव्हरेस्ट चढायला सुरुवात केल्यावर रस्त्यात जंगल, पाणी, बर्फ, थंडी असणार हे निश्चित आहे, मग रस्त्यात झाडी असल्याचे, पाणी असल्याचे, कळसावर बर्फ असल्याचे पुरावे द्या तरच मी एव्हरेस्ट वर चढाई करेन असं बोलणारे अज्ञानी पण स्वतः अति शहाणे समजणारे म्हणायला हवेत. (माहित तर काहीच नसतं पण खूप काही माहित असल्यासारखं दाखवायचं यामुळे यांना कोणतीही माहिती पूर्णपणे मिळत नाही, आणि समोरच्याला यांचे ज्ञान किती आहे याचीही जाणीव होते.) एकदा एव्हरेस्ट चढायला सुरुवात केली कि या सर्व गोष्टी तुम्हाला रस्त्यात मिळणारच आहेत, त्यासाठी पुराव्यांची गरज नाही किंवा गॅरंटीची गरज नाही. या सर्व गोष्टी पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी तुम्हाला आधी चढाईची सुरुवात तर करावी लागेल ?? आपण पायथ्यालाच विचारांच्या गराड्यात अडकून पडलेलो असतो.
नाही एव्हरेस्ट चढता आला, किमान काहीतरी उंचीवर पोहोचाल कि नाही? त्या अनुभवावर दुसरा एखादा पर्वत पार करू शकाल कि नाही? किमान गिर्यारोहण कसे करायचे असते, त्यात काय अडथळे येतात, ते कसे पार करावे लागतात, अचानक काही आणीबाणी अली तर त्याला कसे तोंड द्यायचे याचा तर अभ्यास होईल कि नाही ? पण नाही, आम्हाला सगळं काही सुरक्षित हवंय, जागेवर हवंय, गॅरंटेड हवंय, नाहीतर आम्ही प्रयत्न सुद्धा करणार नाही अशी आपली मानसिकता झालेली आहे.
अशा मानसिकतेमध्ये तुम्हाला दोनच पर्याय मिळतात. पहिला, तुमच्या अळशीपणाचा फायदा घेऊ पाहणारे तुम्हाला हेलीकॉप्टर ने कळसावर नेतो म्हणणारे आणि त्या बदल्यात तुमच्याकडून काहीतरी शुल्क घेणारे. दुसरा पर्याय असतो तो म्हणजे तेवढाच किंवा त्याहीपेक्षा जास्त शुल्क घेणारा परंतु खऱ्या मार्गदर्शकांचा जे तुम्हाला स्पष्टपणे संगतात, कि स्वतः प्रयत्न करणार असाल, बिनकामाच्या शंकांना फाटा देऊन आहे त्या परिस्थिती चांगले काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्ही तुम्हाला काहीतरी मदत करू शकतो. पण चढाई तुम्हालाच करावी लागेल....  अशा वेळी आपण पहिला पर्याय निवडतो आणि दुसरा पर्याय नाकारतो.
पण पहिला पर्याय सपशेल अपयशी ठरणार असतो. कारण यांचं हेलीकॉप्टर कळसावर जाऊच शकत नाही. वाऱ्याच्या दबावामुळे हेलिकॉप्टर कोसळू शकते हे पायलट ला माहित असते, त्यामुळे तो थोड्या उंचीवर गेला कि तुम्हाला मध्यातच सोडून देतो. मग खरी मजा येते. ना तुम्हाला गिर्यारोहणाचा अनुभव असतो, ना वातावरणाशी जुळवून घेण्याचा. आता दुसऱ्या पर्यायाची साथ घेण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा मार्ग नसतो. पण त्याची मदत येईपर्यंत सुद्धा भरपूर वेळ जातो आणि तुमचं व्हायचं तेवढं नुकसान झालेलं असतं. या गोंधळात तुम्ही मधेच कुठेतरी अडकून पडता. याचवेळी ज्यांनी पायापासून चढाईची सुरुवात केलेली असते ते हळूहळू वर पोहोचतात सुद्धा कारण जे होईल ते होईल पण मला हा पर्वत चढायचाच अशी मानसिकता करून ते पुढे निघालेले असतात. स्वतःचे मार्ग स्वतः तयार करत असतात. अशावेळी त्यांना कोणतीहि अडचण थांबवू शकत नाही.

आता पुन्हा मूळ मुद्द्याकडे... गरिबीतून वर आलेल्या उद्योगजकांनी स्वतःचे मार्ग स्वतः निवडलेले असतात. त्यांनी हि मार्गदर्शकांची गरज पडते पण ते फक्त योग्य निवड करण्यासाठी. प्रयत्न करण्याचे काम हे उद्योजक स्वतःच करत असतात. त्यांना कशाचीही अपेक्ष नसते. त्यांचं उद्दिष्ट खूप स्पष्ट असतं, काम करायचंय, पैसा कामवायचाय, मोठं व्हायचंय... मग त्यासाठी काहीही करावं लागलं तरी त्याची तयारी आहे. यामुळे फायदा असा होतो कि हे उद्योजक व्यवसायातील पूर्ण बारीक सारीक गोष्टी शिकतात, अनुभव घेतात, प्रत्येक गोष्टीचा मर्म समजून घेतात, थोडक्यात व्यवसायाची बाराखडी समजून घेतात, अशावेळी अपयशाची शक्यता नगण्य किंवा शून्यच असते.

प्रश्न गरीब श्रीमंतांचा नाही, तर यशस्वी उद्योजक होण्यासाठी काय करायला हवं याचा आहे. गरिबीतून वर आलेल्या उद्योजकांचा यशाचा आलेख चढता असतो कारण परिथितीमुळे त्यांनी व्यवसायाचा एव्हरेस्ट पायापासून चढाईची सुरुवात स्वतः केलेली असते, ना कि कुणाच्या कुबड्या घेऊन. म्हणूनच त्यांच्यासाठी यशस्वी भवितव्य पायघड्या पसरून वाट बघत असतं. उलट असेही म्हणता येईल कि आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे यांना स्वतः प्रयत्न करणे भाग असते आणि हीच परिस्थिती त्यांच्या यशासाठी कारणीभूत ठरते.

तुम्ही श्रीमंत आहात, मध्यमवर्गीय आहात किंवा गरीब, फरक पडत नाही; स्वतः प्रयत्न करणार असाल, आणि यश अपयशाच्या चुकीच्या संकल्पनांना फाटा देणार असाल तरच तुम्ही व्यवसायात यशस्वी होऊ शकता.*      

व्यवसाय साक्षर व्हा...
उद्योजक व्हा...
समृद्ध व्हा...
_____

श्रीकांत आव्हाड

Comments